Curatorial note:
मराठी माउली माझी…
मराठी. आपली मातृभाषा. जन्म देणाऱ्या आईशी जे नातं असतं, तेच नातं मातृभाषेशी असतं. आचार्य विनोबा भावे गीतेविषयी म्हणत – गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता उचलुनी घेई कडेवरी! मराठीविषयीही आपली भावना अशीच आहे. श्रवणबेळगोळ इथं सापडलेल्या शिलालेखापासून मराठीचा प्रवास ज्ञात आपल्याला ज्ञात होता. आता त्याही आधीच्या काळातला शिलालेख रायगड जिल्ह्यात सापडला आहे. अर्थात मराठी ही भारतातील एक जुनी व महत्त्वाची भाषा आहे, यात शंका नाही. सध्या ती जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये अकराव्या क्रमांकावर आहे. जगभरात सुमारे दहा ते १५ कोटी लोक मराठी भाषा बोलतात.
भारतात हिंदी व बंगालीच्या खालोखाल सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मराठीच आहे. आद्यकवी मुकुंदराज, चक्रधरस्वामी, म्हाइंभट्ट, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा परंपरेतून आजच्या नवोदित लेखकापर्यंत अनेक साहित्यिक-कवींनी मराठीत लेखन करून या भाषेच्या वैभवात भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांची मातृभाषा मराठी होती, या कल्पनेनेही आपली छाती अभिमानाने भरून येते. मराठी भाषेने अनेक सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे पाहिली. यादवकाळ पाहिला, मोगलाई बघितली, ब्रिटिशराज बघितले, तसेच स्वतंत्र भारतही बघितला. स्वातंत्र्यानंतर मराठी लोकांचा प्रदेश म्हणून संयुक्त महाराष्ट्र राज्यासाठीही येथील जनतेने प्राणपणाने लढा दिला. सोळाव्या शतकातील फादर थॉमस स्टीफन्स यांनी ‘जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी, किं परिमळांमाजि कस्तुरि, तैसी भासांमाजि साजिरी, मराठिया’ अशा शब्दांत मराठीचे वर्णन केले आहे. ही भाषा वरकरणी रांगडी, कठोर वाटत असली, तरी या प्रदेशातील राकट-कणखरपणासोबतच संतसाहित्याच्या गोडव्याचा अंशही तिच्यात पुरेपूर उतरला आहे. आधुनिक मराठी भाषेत सध्या विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होते आहे. मोठमोठी साहित्य संमेलने भरतात. ही खास मराठी परंपरा आहे. आधुनिक काळातील सर्व तंत्रांचा स्वीकार करत मराठी भाषा आपले स्थान टिकवून आहे. तिची ही थोडी ओळख दाखविण्याचा प्रयत्न या दालनाद्वारे आम्ही केला आहे. अर्थात ही केवळ झलकच आहे; मराठीच्या महासागरातील सर्वच मौक्तिके येथे ठेवणे शक्य नाही, याची आम्हाला नम्र जाणीवही आहे. मात्र, हे प्रदर्शन पाहून मराठीविषयीचे आपले कुतूहल वाढो, आत्मीयता वाढो आणि मराठीचा गजर त्रिखंडात दुमदुमत राहो, हीच यामागची प्रामाणिक सदिच्छा आहे.
– श्रीपाद ब्रह्मे
ज्येष्ठ पत्रकार व लेखक
जनसामान्यांची मराठी…
संस्कृतीचे वहन भाषा करते, असं म्हणतात. भाषेमुळे एखाद्या प्रदेशाची वा समाजाची प्रादेशिक ओळख अधोरेखित होत असते. भारतासारख्या सांस्कृतिक व सामाजिक वैविध्याने समृद्ध असलेल्या देशात जगातील सर्वाधिक भाषा व बोली भाषा आहेत. त्यामुळं येथील साहित्यही तेवढंच वैविध्यपूर्ण आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी असणारी एक व जगातील बोलली जाणारी तिसरी मोठी भाषा मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. मराठीला सुमारे दीड हजार वर्षांचा समृद्ध वारसा असून, तिची उत्क्रांती इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून झाली आहे. सर्वसामान्यांना संस्कृतमधील ज्ञान मिळावे यासाठी संतांनी मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर केला. मुकुंदराज व संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली मराठी परंपरा २१ व्या शतकातही तेवढ्याच सक्षमतेने पुढे जात आहे. केवळ काळानुसार शैलीत फरक झाला असला तरी परंपरा कायम आहे. प्रमाण भाषेव्यतिरिक्त मराठीचे सौंदर्य बोलीभाषांनी वाढविले असून, आता ते अधोरेखित होऊ लागले आहे.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या विश्वासाठी एक विशेष दालन झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयात निर्माण केले आहे. याची सुरुवात ज्ञानवृक्षापासून होत असून, येथे आपल्या संतांच्या ओव्या व काही मुळाक्षरे आहेत. मराठी भाषेसाठी दालन करताना केवळ साहित्याचा विचार मर्यादित ठेवलेला नाही तर मराठीची आजवरची वाटचाल म्हणजे तिच्या उत्क्रांतीपासून ते २१ व्या शतकात तिचे बदलते स्वरूप येथे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना सर्वच गोष्टींचा समावेश करणे शक्य झाले नसले तरी एक परिपाक आपल्या सर्वांपुढे सादर केला आहे.
मराठी भाषेवरील दालनात आपल्याला मराठीचा इतिहास, तिचे बदललेले स्वरूप, साहित्यापलीकडची मराठी, समाजप्रबोधनापासून ते इंग्रजी सत्तेला उखडून टाकण्यासाठी मराठीचा झालेला प्रभावी वापर, स्वांतसुखायपासून ते मनोरंजनापर्यंत झालेला मराठीचा प्रवास, वृत्तपत्रांतील मराठी ते विपणनाची मराठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच, इंटरनेच्या युगात मराठी कशाप्रकारे आशयनिर्मितीचे माध्यम बनली आहे, हेही या ठिकाणी आपल्याला अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मराठी साहित्य अभिरूचिसंपन्न करण्यासाठी योगदान दिलेल्या कवि व लेखकांची आमच्या संग्रहातील मूळ पत्रे, त्यांची हस्ताक्षरे, स्वाक्षऱ्या, पत्रसंवादाच्या मूळ प्रती येथे ठेवल्या आहेत. त्याच जोडीला साहित्यातील योगदानासाठी देशातील ज्ञानपीठ या सर्वोच्च साहित्य सन्मानाने अलंकृत झालेल्या साहित्यिकांची माहितीसुद्धा येथे आहे.
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या अशा या आपल्या मराठी भाषेचा इतिहास सांगणारे हे दालन समृद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आगामी काळात मराठी साहित्याशी संबंधित विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा मानस आहे. त्यात आपणही निश्चितच सहभागी व्हाल, असा विश्वास आहे.
ओंकार भिडे,
क्यूरेटर, मुक्त पत्रकार